हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात आदरणीय आणि वंदनीय होते.त्यांच्या इच्छा, आकांक्षा ,कृती आणि तत्त्वज्ञान जनतेकडून अतिशय आदराने आणि अभिमानाने स्वीकारले गेले होते.त्यामुळे अशा बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला स्मारकाच्या रुपात अजरामर करण्याच्या जनतेच्या इच्छेचा मान ठेऊन ती पूर्ण करण्यात येत आहे.
२७ डिसेंबर २०१६ रोजी त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केला.श्री. उद्धवजी ठाकरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त संस्थेची स्थापना करण्यात आली तिची अधिकृत नोंदणी करण्यात आली.हे स्मारक भव्यदिव्य बनण्यासाठी उद्धवजी ठाकरे अतिशय कठोर परिश्रम घेत आहेत. स्मारक परिपूर्ण बनविण्यासाठी ज्या जनमानसात बाळासाहेब लोकप्रिय होते ,त्या लोकांच्या आठवणी ,जे प्रेम लोकांनी त्यांना दिले होते त्या सगळ्या आठवणी लोकांनी स्मारक समितीकडे कळवाव्यात अशी विनंती उद्धवजींनी जनतेला केली आहे.कोणी काही अभिनव कल्पना सुचविल्यास त्याही स्वागतार्ह आहेत.
उद्धवजींची मनापासून अशी इच्छा आहे की हे स्मारक जनतेच्या संकल्पना आणि इच्छांनुसार उभे रहावे. ह्या स्मारकामध्ये बाळासाहेबांच्या आठवणी,मौल्यवान वस्तू,आप्तेष्टांबरोबरचा पत्रव्यवहार, अमूल्य व्यंगचित्रे,हास्यचित्रे,संपादकी अग्रलेख,लेख आणि पत्रकारीतेतील साहित्याचा समावेश करण्यात येणार आहे.हे सगळे पैलू त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व दर्शवितात.
बाळासाहेब हे जनतेचे नेते होते.सामान्यातला सामान्य माणूसही स्मारक निर्मितीच्या कार्यात सहभागी होऊ शकतो.त्याचे मनापासून स्वागत आहे.ह्यासाठी विश्वस्त मंडळाने सदस्यत्वाची मोहीम सुरु केलेली आहे.विहित मार्गाने प्रयत्न केल्यास इच्छुकांना सदस्यत्व मिळू शकेल.बाबासाहेबांच्या लक्षावधी अनुयायांचे मोलाचे सहकार्य आणि पाठिंबा, ठरलेल्या कालावधीत हे विशाल स्मारक पूर्ण करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल.
बाळासाहेबांच्या विचार आणि तत्त्वज्ञानाचा, अभ्यास करणे.त्यांच्या तत्त्वज्ञानाचा समकालीन तत्त्वज्ञानाबरोबर तुलनात्मक अभ्यास करणे. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे जीवनचरित्र प्रकाशित करणे.वाचनालय सुरु करणे आणि ज्यांनी मातृभूमीसाठी त्याग केला त्या समकालीन नेत्यांचे स्मरण करणे.
कला, संस्कृती,समाजशास्र,अर्थशास्र या शाखांमधील संशोधनाला प्रोत्साहन देणे. कलाप्रकारांना विशेषतः हास्यचित्रे,व्यंगचित्रे रेखाटन, ह्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्प सुरु करणे.स्मारकाच्या प्रांगणात चर्चा,परिसंवाद,अधिवेशने आयोजित करणे.स्मारकाच्या निर्मितीतून शिल्पकलेच्या संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे.सेवाभावी संस्था, उद्योगसमूह ,नागरिकांकडून देणग्या स्वीकारुन निधी जमा करणे.